महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी सुमारे १०६ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. याबाबतचे वृत्त डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
पंकजा मुंडे मंत्री असलेल्या महिला व बाल कल्याण विभागाने राज्यातील ३० जिल्ह्यातील ८५ हजार ४५२ अंगणवाडी केंद्रासाठी सुमारे लाखभर मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंकजा यांच्या विभागाने बंगळुरू स्थित एमएस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा. लि. या कंपनीकडून पॅनासोनिक इलुगा १७ हा मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. संगणक माहिती सक्षम रीयल-टाईम मॉनिटरींग (आयसीटी-आरटीएम) योजनेसाठी स्मार्टफोन्स खरेदी करण्यात येत आहेत. याबाबतचा सरकारी अध्यादेश (जीआर) २८ फेब्रुवारी २०१९ रोजी काढण्यात आला असून, त्यात हे मोबाईल सिम कार्ड आणि डेटा प्लॅनसह अंगणवाडी सेविकांना वितरित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
पॅनासोनिक इलुगा १७ हा स्मार्टफोन मोबाईल खरेदी करताना प्रत्येक मोबाईल मागे कंपनीला सुमारे २२०० रूपये जास्तीची रक्कम देण्यात आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. पॅनासोनिक इलुगा १७ या मोबाईल फोनची बाजारपेठेतील किंमत ६ हजार ४९९ रूपये इतकी आहे. तर, हा मोबाईल ६००० ते ६४०० रूपयांत उपलब्ध होतो. मात्र, पंकजा यांच्या विभागाने या मोबाईलची खरेदी करताना ८ हजार ७७७ रूपये इतकी किंमत मोजली आहे. त्यामुळे प्रत्येक मोबाईलची किंमत सुमारे २२०० रूपये इतकी वाढविण्यात आली आहे. तसेच महिला व बाल कल्याण विभागाने एमएस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा. लि. या कंपनीकडून आणखी ५ हजार १०० मोबाईल अतिरिक्त खरेदी केले आहेत.
या मोबाईल खरेदीत सुमारे १०६ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, अशी मोठी खरेदी (बल्क क्वांटिटी) करण्यापूर्वी कंपनीची पडताळणी करायला हवी होती. या कंपनीचा पत्ताही निविदा कागदपत्रात दाखविण्यात आला नाही. तसेच सरकारने या मोबाईलची खरेदी करताना किंमत कमी करण्याबाबत बोलणी करायला हवी होती. हेच मॉडेल जर ६ हजार ४९९ रूपयांत बाजारात उपलब्ध असेल तर या विभागाने अधिकचे २२०० रूपये का मोजले? यात नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि याची चौकशी करणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे, पॅनासोनिक इलुगा १७ हे मॉडेल एप्रिल २०१८ मध्ये लॉन्च करण्यात आले. मात्र, त्यानंतर त्याचे लागलीच उत्पादन थांबले. आता तर हा मोबाईल बाजारात उपलब्धच नाही. त्यामुळे एमएस सिस्टेक आयटी सोल्युशनने या मोबाईलची विक्री बेकायदेशीररित्याच केली असे म्हणावे लागेल असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्मार्टफोन मोबाईलची खरेदी तत्काळ थांबवावी. तसेच चौकशी समिती स्थापन करून याचे सत्य समोर आणले पाहिजे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
दरम्यान, पंकजा मुंडे यांना यासंबंधित विचारपूस करण्यासाठी संपर्क साधला त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या खरेदी प्रकरणाची आपल्याला काहीही माहिती नाही असे सांगत यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
08 March 2019
Home »
» *मोबाईल खरेदीत पंकजा मुंडेंचा १०६ कोटींचा घोटाळा : धनंजय मुंडेंचा खळबळजनक आरोप*








0 comments:
Post a Comment