बिलोली:कर्मयोगी बाबासाहेब देशमुख स्मृतीदिनी रोगनिदान शिबिरात ३२७ रुग्णांची तपासणी : म . ज्यो . फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नांदेड येथील तज्ञ डॉक्टरांचा सहभाग ग्रामीण भागात राहणारे अनेक व्यक्ती रोगाचे निदान न होऊ शकल्याने किंवा लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाची जोड करू न शकल्याने आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करतात . पुढे तो दुर्धर बनतो आणि रुग्णाचा अंत होतो . याविषयी जनजागृती व्हावी आणि गरजू व्यक्तींना उपचारासाठी योग्य ते सहकार्य करता यावे यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेचे संस्थापक आ . कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृषि विज्ञान केंद्र व संजीवनी आरोग्य मंदिर यांच्या वतीने आज ( दि . १७ ऑगस्ट ) सगरोळी येथील माणिकप्रभू मठात आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . अस्थिरोग , सगरोळी व परिसरातील १०३ महिला , ९ बालके यासह ३२७ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली . सर्वसाधारण आजारासह कान , नाक , घसा , कर्करोग , बालरोग आदी रुग्णांनी याचा लाभ घेतला . डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड , अपेक्षा क्रिटीकल केअर व मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल नांदेड , नंदीग्राम हॉस्पिटल नांदेड व लोटस हॉस्पिटल नांदेड येथील तज्ञ डॉक्टरांनी यात सहभाग घेतला . शिबिरात रुग्णांना मोफत औषधे पुरविण्यात आली व गरजेनुसार १६ रुग्णांना पुढील तपासणी तसेच उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला . संस्थेचे विश्वस्त श्री . सुनिलरावजी देशमुख यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले . महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एमडीइंडिया हेल्थ इन्शुरन्स टीपीए चे विभागीय प्रमुख श्री . शरद पवार यांनी पिवळी शिधापत्रिका धारक व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन करताना शिबीर आयोजनासाठी सगरोळी संस्थेचे आभार मानले . कृषि विज्ञान केंद्र व संजीवनी आरोग्य मंदिर येथील सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने हे शिबीर यशस्वी झाले , असे विचार संस्थेचे वैद्यकीय अधिकारी तथा सचिव डॉ . जयंत जकाते यांनी मांडले .
18 August 2022
Home »
» कर्मयोगी बाबासाहेब देशमुख स्मृतीदिनी रोगनिदान शिबिरात ३२७ रुग्णांची तपासणी







0 comments:
Post a Comment