भोकर प्रतिनिधी:- कोणतेही काम हलके न समजता मिळालेले काम मन लावून करा. कारण कोणताही मनुष्य त्याच्या कर्मानेच मोठा होऊन यशाची शिखरे पादाक्रांत करत असतो असे विचार नांदेड येथील सहाय्यक समाज कल्याण आयुक्त मा.शिवानंद मिनगीरे यांनी बोलताना व्यक्त केले. ते भोकर शहरातील भगवान विश्वकर्मा मंदिरात आयोजित प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना नोंदणी शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस.आर.सारंगधर, खादी ग्राम उद्योगाचे प्रमुख यादव सर,मंडळ अधिकारी मगरे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की स्वकर्म हीच आपली पूजा आहे म्हणून कोणतेही काम हलके समजू नका अनेक महापुरुषांनी आपल्या वाट्याला कितीही कमी दर्जाचे काम आले तरी त्यांनी त्या कामाचा आदर करून श्रद्धापूर्वक कामे केली म्हणून ती आज अजरामर आहेत. हे पटवून सांगताना त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम लिंकन यांचे उदाहरणे देऊन हे महापुरुष आपल्या कर्मयोगानेच श्रेष्ठ बनले असून अजरामर झाले आहेत तेव्हा प्रत्येकानी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्रद्धेने व मन लावून कामे करावीत असे सांगितले. पुढे मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेब यांनी भारतातील बारा बलुतेदार समाज स्वयंपूर्ण झाला तरच आपला देश उन्नती साधू शकतो व स्वावलंबी बनु शकतो हि बाब लक्षात घेऊन अठरा पगड जातीच्या उन्नतीसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजनेचा शुभारंभ केला आहे. त्यामुळे प्रत्येक बारा बलुतेदार समाजातील व्यक्तींनी या योजनेत आपल्या नावाची नोंदणी करून आपल्या उद्योगासाठी आर्थिक लाभ मिळवून घ्यावा व आपली,आपल्या कुटुंबाची व परिणामी आपल्या राष्ट्राची उन्नती साधावी असे उपस्थितांना आवाहन केले. या योजनेचा शुभारंभ भगवान विश्वकर्मा यांच्या आरतीने व दीप प्रज्वलनाने करण्यात आला.यावेळी मंदिराचे महंत परमेश्वर महाराज,नागनाथराव देशमुख,बालाजी खरगे पाटील,एस.आर. सारंगधर,अॅडो.परमेश्वर पांचाळ,दत्तात्रय पांचाळ,पत्रकार बांधव आदीसह अनेकांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्वकर्मा प्रतिष्ठान,विश्वकर्मा युवा संघ व विश्वकर्मा महिला संघ भोकर यांनी मोलाचे परिश्रम घेतले. प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना नोंदणी कार्यक्रमात शहरासह तालुक्यातील शेकडो कारागिरांनी आपला सहभाग नोंदवुन आपल्या नावाची नोंदणी करून घेतली.







0 comments:
Post a Comment