१६ ऑक्टोंबर पासून नामनिर्देशन भरण्यास सुरुवात;तर ५ नोव्हेंबर रोजी मतदान
भोकर : महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोग यांच्या आदेशाने राज्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक माहे जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती,नव्याने स्थापीत व सन २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणूकासाठी संगणक प्रणालीव्दारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागाच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपरिक पद्धतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषीत झाला असून भोकर तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा यात समावेश आहे.दि.१६ ऑक्टोंबर पासून नामनिर्देशन भरण्यास सुरुवात होणार असून दि.५ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी व २ हजार ९५० सदस्यपदाच्या आणि १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी दि.५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे,अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी.एस.मदान यांनी केली असून सर्व संबंधितांना राज्य निवडणूक आयोगाचे उप सचिव के.सूर्यकृष्णमूर्ती यांनी लेखी पत्राद्वारे आदेशित केले आहे.याच अनुषंगाने भोकर चे तहसीलदार तथा राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी राजेश लांडगे यांनी भोकर तालुक्यातील भुरभूशी,सावरगांव मेट,गारगोटवाडी दि.,रहाटी बु.,मातुळ,दिवशी बु.,धावरी बु.,सायाळ, चिदगीरी व चिंचाळा प.भो.या १० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असल्याने निवडणूक होत असलेल्या उपरोक्त १० ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
उपरोक्त ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी रिंगणात उतरु इच्छिणाऱ्या उमेदवारांना दि.१६ ते २० ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील.नामनिर्देशनपत्रांची छाननी दि.२३ ऑक्टोंबर २०२३ रोजी होईल व नामनिर्देशनपत्रे दि.२५ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत मागे घेता येतील. तसेच त्याच दिवशी वैध नामनिर्देशित उमदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.तर दि.५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान करता येणार आहे व दि.६ नोव्हेंबर २०२३ रोजी भोकर तहसिल कार्यालयाच्या तळमजल्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.होऊ घातलेली निवडणूक कायदा,शांतता,सुव्यवस्था व आचारसंहितेचे पालन करुन निर्भयपणे पार पाडण्यासाठी तहसिलदार राजेश लांडगे व पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे हे आपआपली यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.तर गावगाड्याचा कारभारी थेट जनतेतून निवडायचा असल्याने गटागटात चुरशिचे वातावरण निर्माण झाले असून दिवाळी पुर्वीच फटाके व आतिषबाजीने विजयाचा जल्लोष करण्यासाठी भावी गावकारभाऱ्यांत निवडणूकीचा धुमशान सुरु झाला आहे.







0 comments:
Post a Comment