भोकर:अनेक दिवसांपासून भोकर शहरातील गैरवाहतूकीच्या कोंडीमुळे जनता त्रासून गेली आहे. त्याबद्दल सर्वांच्याच मनात असंतोष खदखदत होत आहे. लहान मुलांना, शालेय विद्यार्थ्यांना, महिला, वृध्द यांना रस्त्यावर चालणं अक्षरशः अशक्य झालं आहे. शहरातील सर्व पत्रकारांनी आपल्या लेखनातून कॅमेऱ्याने वारंवार या प्रश्नावर आवाज उठवला असला तरी प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.
गेल्या महिन्यात सात तारखेला भोकरमधील सर्व स्तरातील जनतेनं विविध राजकीय पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन पालिका प्रशासन व तहसीलदार यांना अल्टिमेटम दिले होते. याच धर्तीवर शाहू महाराज विद्यालयाचे प्राचार्य संजय देशमुख यांनी १७ सप्टेंबर पासून उपोषणाला बसण्याची तयारी दाखवली. मग प्रशासनानं अचानक १६ तारखेला भोकरमधील रस्त्यावरील अतिक्रमणं काढण्यास सुरुवात केली. त्यात अनेक छोट्या छोट्या व्यावसायिकांना त्रास झाला. तो होईल हे गृहीत धरून प्राचार्यांनी या छोट्या व्यावसायिकांना सन्मानाने व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्या मागणीला हरताळ फासला गेला. कोणत्याही नियोजनाशिवाय ती कारवाई केली. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. वाहतूक व्यवस्था तर सुरळीत झालीच नाही. पण दुसऱ्याच समस्या निर्माण झाल्या.
या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात म्हणून प्राचार्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सद्हेतूनं उपोषणाला २ ऑक्टोबर पर्यंत स्थगिती दिली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रशासनाकडून काहीच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अखेर शाहू महाराज विद्यालयाच्या प्राचार्यांना शहरातील गैरवाहतूक कोंडी च्या विरोधात उपोषणाला बसावे लागलेच.







0 comments:
Post a Comment