मुंबई: राज्यातील आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकमत झालं आहे. काँग्रेसची मुख्यमंत्रिपदाची मागणी ही निव्वळ अफवा असल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं. तर
शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे. त्यांनी मोठा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणं आणि त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणं ही आमची जबाबदारी आहे, असं राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आज पहिलीच संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत कोणताही वाद-विवाद न होता किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला. त्यामुळे महाआघाडीचं नवं सरकार राज्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाची मागणी केलेली नाही. त्याबद्दल आमची आमच्या हायकमांडशी चर्चा झालेली नाही. काँग्रेसला मुख्यमंत्रिपद हवंय ही निव्वळ अफवा आहे, असं सांगतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेतच सत्तावाटपाचं ठरणार आहे, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते के. सी. पाडवी यांनीही शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं सूचक विधान केलं होतं. 'सत्ता स्थापनेची प्रक्रिया अद्याप सुरु आहे. निकाल सकारात्मक असेल वैयक्तिकरित्या मला तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल,' अशी शक्यता के. सी. पाडवी यांनी व्यक्त केली होती. शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे. केंद्रातील बहुमताच्या सरकारमधून बाहेर पडणं सोपी गोष्ट नाही. शिवसेनेने त्याग केला आहे. त्याचा सन्मान राखलाच पाहिजे, असंही पाडवी म्हणाले होते.







0 comments:
Post a Comment