बिलोली:संसर्गजन्य कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावर ठोस उपाययोजना केल्या जात असून , ३ मे पर्यंत संपूर्ण देशात ' लॉकडाऊन ' घोषित करण्यात आला आहे . जागतिक आपती म्हणून घोषित झालेल्या संसर्गजन्य कोरोना विषाणूने देशात शिरकाव केला . या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे पाहून केंद्र व राज्य शासनाने ' लॉकडाऊन सह संचारबंदी लागू केली . त्याचे परिणाम सर्वच क्षेत्रातील व्यवसायांवर झाला आहे . ' लॉकडाऊन ' मुळे गवंडी(मिस्त्री) , बांधकाम मजूरांचे मोठे हाल होत असून त्यांच्या कुटुंबीयांवर उपास मारीची वेळ आली आहे . कोरोनाच्या आपत्तीचा सर्वाधिक फटका बांधकाम क्षेत्राला बसला असून शहरासह तालुक्यातील सुरु असलेल्या बांधकाम इमारतींची कामे थांबली आहेत . बांधकाम व्यवसायाला उतरती कळा लागल्याचे चित्र समोर आले आहे . सद्य : स्थितीत बांधकामाच्या सर्व , व्यवहार , साईटस बंद असून बांधकामा अभावी ओस पडले आहेत . बांधकाम व्यवसायाशी निगडित मजूर वर्गाला लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला आहे .बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल बांधकाम व्यवसायावर अवलंबून आहे . मात्र लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर बांधकामे थांबली आहेत . मध्यंतरी वाळूसह अन्य साहित्य उपलब्ध होत नसल्याने बांधकामांचा वेग मंदावला आहे . लॉकडाऊनमुळे तर आता चक्काजाम झाला आहे . बांधकामासाठी लागणारे मटेरियल वाहतूक , प्लंबिंग , रंगकाम , इलेक्ट्रीक फिटिंग , फर्नीचर , सेंटिंग काम करणारे कारागीर , खड्डे खोदकाम करणारे मजूर बांधकाम व्यवसायावर आपले पोट भरतात . कामेच ठप्प झाल्याने मजुरा समोर आर्थिक संकट उभे राहिले आहे . बांधकाम व्यावसायिकांचे भांडवलही मोठ्या प्रमाणात अडकले आहे . सुरू असलेल्या घरांच्या कामाचे सर्वच साईटस बंद पडले आहेत . दरवर्षी बांधकाम व्यावसायिक गुढीपाडव्याला नव्या साईटसचा शुभारंभ करतात . यंदाचे वर्ष याला अपवाद ठरले आहे . बांधकाम क्षेत्राची स्थिती अतिशय केविलवाणी झाल्याचे चित्र दिसून येत आहे , मजूरदार वर्ग फार मोठ्या आर्थिक संकटात सापडले असल्याचे दिसून येते .
... प्रतिनिधी:शुभम निदाने
... प्रतिनिधी:शुभम निदाने







0 comments:
Post a Comment